हेतू....

 सध्याचे युग (२१वं शतक) हे स्पर्धेचे युग मानले जाते.आपण आपल्या आसपास बघितले किंवा स्वतःला जरी बारकाईने बघितले तरी हि गोष्ट आपल्याला समजून येते.आज प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षेत्रात आपल्याला स्पर्धा बघायला मिळते. प्रत्येक जण दुसऱ्या पेक्षा कसं काहितरी चांगलं/ वरचढ करता येईल याच्या मागे लागला आहे. खरंतर दुसऱ्या पेक्षा चांगले करण्यात किंवा स्पर्धा करण्यात काही चुकीचपण नाही. परंतु या सर्व प्रवासात आपण दुसऱ्याला सोडाच पण स्वतःलाही पुरेसा वेळ देत नाही, आपण आपल्या इच्छा, आपली समाजाप्रती, निसर्गाप्रती असलेली कर्तव्ये विसरून जातोय . आणि यामुळेच आपण आपल्या आयुष्यात समाधान, आनंद या गोष्टींपासून वंचित राहतो.

                         या सर्व गोष्टी आपण सगळीकडे पाहत, अनुभवत आहोत. मग याला उपाय काय? आनंदी ,समाधानपुर्वक आयुष्य कसे जगावे ?.असा विचार अनेकदा माझ्या मनात येत होता. मग अनेकदा असे वाटायचे की स्पर्धेच्या युगात स्पर्धा सोडून देणे हा मुर्खपणा ठरेल, त्यामुळे स्पर्धेतुन बाहेर पडणे हा तर उपाय होऊ शकत नाही. मग काय करायचे तर प्रत्येकाने स्वतःच्या इच्छांना, कर्तव्यांना या धावपळीच्या जीवनात थोडा वेळ द्यावा असं मला वाटतं. 

             काही दिवसांपूर्वी मी हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस्क मिरॅलस लिखित " Ikigai- The Japanese Secret of Long and Healthy Life" हे पुस्तक वाचलं आणि पुस्तकातले बरेचशे विचार माझ्या विचारांशी मिळते जुळते वाटले, आणि त्यानंतर मी हा लेख लिहायचा विचार केला.

            Ikigai- या पुस्तकात खासकरून 'ओकिनावा' या जपानच्या एका बेटावरील लोक कशी लांब, आरोग्यदायी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे समाधानी आयुष्य  जगतात याबद्दल सांगितले आहे. मग यामध्ये तेथील लोकांचा आहार, रोजचा हलका व्यायाम या गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आपल्याला पण बऱ्यापैकी माहीत आहेत. पण यापलीकडे आपण ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो अशा काही गोष्टींबद्दल पण सांगितले आहे, जसे समाज्यामध्ये सहभागी होणे ( इतरांना थोडा वेळ देणे) , आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःच्या आयुष्याचा हेतू ( purpose) शोधने आणि तो प्राप्त करण्यासाठी न थकता झगडत राहणे ही महत्वाची गोष्ट सांगितली आहे.       आता 'हेतू 'या शब्दाचा आपण विचार केला की आपल्याला समजते की आपण याचा जास्त विचार करत नाही. ' माझ्या आयुष्याचा हेतू काय? ' याचा आपण विचार केला तर आपल्याला थोडंसं किचकट वाटतं. आता या प्रश्नाला थोडंसं सोपं करायचं म्हटलं तर आपण पहिलं आपल्या सवयी, आवडीनिवडी (interest ) ओळखु शकतो आणि आपल्या आवडीसंबंधीच्या क्षेत्रात मोठं काहितरी करणं त्याबरोबरच इतरांसाठी, पर्यावरणासाठी काहीतरी करणं हा आपल्या आयुष्याचा हेतू असु शकतो.

               जर आपल्याला लवकरच स्वतःच्या आवडी, इच्छा समजल्या तर आपला हेतू ठरवणे व तो प्राप्त करणे थोडंसे सोपे होऊ शकते. पण इथे एक अडचण आहे खासकरून ग्रामीण भागात, जिथे विद्यार्थ्यांना स्वतःचे interest's ओळखायची संधी मिळत नाही, आणि मिळालीच तरी त्याला प्रोत्साहन कोणी देत नाही ( ना पालक ना शिक्षक). कारण अनेकांची मानसिकता अशी असते की जर काहीतरी मोठे करायचे असेल तर पुस्तकी ज्ञान व पुस्तकी हुशार असणे गरजेचे आहे. मग या सर्व वातावरणामध्ये जे कोणी खेळांमध्ये, गायन- वादनामध्ये हुशार आहेत अशा मुलांना पालकांकडून तसेच शिक्षकांकडून फारसं प्रोत्साहन मिळत नाही. त्यामुळे अशी मुले जरी त्यांच्या आवडी दुसऱ्या असल्या तरी ते तिकडे न जाता जिथे सर्वजण चाललेत अशा क्षेत्रांमध्ये जातात व अप्रत्यक्षपणे स्वतःची वाढ खुंटवतात. कारण जरी ते अशा क्षेत्रांमध्ये जास्त पैसे कमवत असले, घरच्यांना आनंदी, समाधानी ठेवत असले तरी स्वतःला मात्र समाधानापासुन दुर ठेवतात.कारण फक्त पैसा माणसाला समाधानी ठेवू शकत नाही तर ज्या क्षेत्रात आपण काम करतोय, जे कार्य आपण करतोय ते किती आवडीने व मनापासून करतोय या गोष्टी खऱ्या अर्थाने समाधान मिळवून देतात. आणि हे आपण तेव्हाच करू शकतो जेव्हा आपण आपल्या आवडीसंबंधी क्षेत्रात कार्य करत असु. 

              यावरून आपल्याला हे लक्षात येते की, आपले आयुष्य समाधानकारक ठेवण्यासाठी काय करावे तर दुसरे करतात म्हणून त्यांच्यासारखे काहीतरी करणे , एखाद्या क्षेत्रात खूप पैसे मिळतात किंवा एखाद्या क्षेत्राची समाजात वाहवाह होतेय म्हणून आपणही तेच करणे, असे न करता आपल्या आवडी ओळखणे, त्यानुसार आपल्या आयुष्याचा हेतू ठरवणे व तो प्राप्त करण्यासाठी झगडणे असे करणे गरजेचे आहे. आणि यामध्ये पालकांनी व शिक्षकांनीही मुलांना प्रोत्साहन देणे महत्वाचे ठरते नाकी फक्त, तु एवढा एवढा अभ्यास कर, एवढी एवढी मार्क पाड इ. चा ताण मुलांना देणे.

वरील चर्चेवरून आपल्याला एवढं नक्की समजतंय की जर आपल्याला आपले आयुष्य आनंदाने, समाधानाने जगायचे असेल, तर आपल्याला आपल्या जीवनाचा हेतू ओळखणे गरजेचे आहे. आता तो कसा ओळखावा तर त्यासाठी आपण खालील गोष्टी करू शकतो:

           १) स्वतःला वेळ देणे : आठवड्यातुन किंवा महिन्यातुन एकदा एकटच एखाद्या शांत ठिकाणी जाणं, तसेच दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी देणं किंवा चिंतन ( meditation) करणं आणि हे सर्व करत असताना स्वतःचा विचार करणे, मी काय करतोय? काय करायला पाहिजे? मला कशात आवड आहे? मी माझी कौटुंबिक, सामाजिक, निसर्गाप्रतीची कर्तव्ये पार पाडतोय का? या गोष्टी स्वतःला विचारणे आणि या प्रश्नांची उत्तरे मिळाली की काय केले पाहिजे ते ठरवणे.

         २) समाजात जाणे/ मित्र- मैत्रिणींना भेटणे : यामुळे आपल्याला समाजात काय चालु आहे , समाजाप्रती आपली कर्तव्ये काय आहेत?, आपण  कोणाची मदत करू शकतो का? या गोष्टी समजून जातील.

         ३) निसर्गामध्ये फिरणे : यामुळे आपल्याला निसर्ग/ पर्यावरणामध्ये काय चालु आहे?, पर्यावरण जे आपल्याला देतय त्या बदल्यात आपण काय देतोय? या गोष्टी लक्षात येतील. आणि निसर्गाप्रती आपले काय योगदान असले पाहिजे हे आपल्याला समजून जाईल.

                                         या गोष्टी केल्या की मला वाटतं , काही काळानंतर आपल्याला आपल्या जीवनाचा हेतू नक्कीच सापडेल. एक असा हेतू ज्यामध्ये आपल्या आवडी निवडी तर असतीलच पण त्याचबरोबर समाजाप्रती, निसर्गाप्रती असलेली आपली कर्तव्ये पण पुर्ण होतील. आणि एकदा आपला हेतू लक्षात आला की मग त्यासाठी मरेपर्यंत कार्यरत राहण्याची उर्जा आपल्यात निर्माण होईल आणि हीच उर्जा आपल्याला कायम प्रयत्नशील, आनंदी व समाधानी राहण्यात मदत करेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चंद्र आणि चंद्रयान ३ (भाग-१)

चंद्र आणि चंद्रयान -३( भाग -२)